नवी दिल्ली – देशात कोरोनाची दुसरी लाट विषाणूच्या सहा नव्या प्रकारामुळे स्फोटक स्थितीत पोहोचली आहे. विषाणूने भारतातच तीन रूप बदलले आहेत. इतर तीन ब्रिटन, दक्षिण अफ्रिका, आणि ब्राझीलहून आले आहेत. एका परिसरात तीन प्रकारचे विषाणू आणि इतर राज्यात दोन प्रकारच्या विषाणूमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिनोम सिक्वेंसिंगची माहिती सार्वजनिक करताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १० राज्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रात ६० टक्के रुग्ण विषाणूच्या नव्या प्रकाराचे असल्याने महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, विषाणूमध्ये सहा बदल आढळले आहेत. त्यामध्ये ब्रिटिश (बी.१.१.७), दक्षिण अफ्रिकी (बी.१.३५१) आणि ब्राझील (पी.१) वरून आलेले आहेत. देशात एक वर्ष धुमाकूळ घातल्यानंतर कोरोना विषाणूमध्ये बदल झाला असून, आता तो ई ४८४ क्यू, एल ४५२ आर आणि एन ४४० के या नव्या रूपात समोर आला आहे. मूळ विषाणूच्या तुलनेत नवे प्रकार दोन ते सहापट अधिक परिणामकारक आहेत.
२३ राज्यांमधील १४ हजार नमुन्यांचे जिनोम सिक्वेंसिंग करण्यात आले आहे. त्यामध्ये १८ राज्यांमध्ये विषाणूचे एकापेक्षा अधिक प्रकार आढळले आहेत. त्यापैकी १० राज्यांमध्ये एकाच वेळी दोन प्रकारच्या विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. दिल्लीमध्ये आढळलेल्या तीन प्रकारच्या विषाणूमध्ये ब्रिटिश स्ट्रेनचा समावेश आहे.
लसीकरणावर प्रश्नचिन्ह
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की एकाहून अधिक वेळा रूप बदलेल्या विषाणूपासून लस वाचवू शकेल की नाही याबाबत वैज्ञानिकांना अद्याप कळू शकलेले नाही. सध्या जिनोम सिक्वेंसिंगच्या माध्यमातून विषाणूला समजून त्याच्यापासून बचाव करणे आवश्यक आहे.
अहवाल निगेटिव्ह, फुफ्फुस खराब
पुण्यातील एनआयव्ही संस्थेच्या डॉ. प्राची यादव म्हणाल्या की, विषाणूचे तीन परदेशी आणि तीन भारतीय प्रकार वेगाने फैलावत असून ते अधिक प्रभावी आहेत. अनेक नुमन्यांच्या तपासणीत यांची ओळख पटवणे अवघड झाले आहे. त्यामुळे निगेटिव्ह अहवाल आल्यानंतरसुद्धा अनेक लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. तसेच त्यांचे फुफ्फुसांवर परिणाम झाला आहे.
सहा प्रकार अन् मृत्यूदर चौपट
देशात २६ फेब्रुवारीपर्यंत १६,५६२ रुग्ण आढळले होते. तसेच ११४ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. परंतु ६ एप्रिलला रुग्णसंख्येत सहापट वाढ होऊन रुग्णांचा आकडा ९६,९८२ झाला होता. मृतांचा आकडा चारपट वाढून आकडा ४४६ वर पोहोचला होता.