नवी दिल्ली – भारतीय बनावटीची लस कोवॅक्सिनवरुन ब्राझिलमधील वातावरण प्रचंड तापले आहे. तब्बल २४०० कोटी रुपयांमध्ये २ कोटी लस खरेदी करण्याचा करार ब्राझिल सरकारने भारतीय कंपनी भारत बायोटेकशी केला होता. चढ्या दरात ही लस खरेदी करण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर ब्राझिलमधील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. ही बाब लक्षात घेताच ब्राझिल सरकारने हा लस खरेदी करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारत बायोटेकला मोठा झटका बसला आहे. हे सारे काही होत नाही तोच आता या करारावरुन चौकशीचे आदेश ब्राझिलच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रपती जेर बोलसानारो हे अडचणीत सापडले आहेत. येत्या ९० दिवसात या खरेदी कराराची चौकशी करण्यात येणार आहे. यात राष्ट्रपतींचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे विरोधकांनी पुन्हा ब्राझिल सरकारविरोधात आरोपांची राळ उठवली आहे. त्यामुळे तेथील वातावरण आणखीनच तापले आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणात करार रद्द झाल्याने भारतीय कंपनीला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे.