इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – घरे, कार्यालये, बँका, दुकाने फोडून चोरटे हात साफ करत असल्याच्या बातम्या आपण नेहमी वाचतो. परंतु एका न्यायालयात चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना घडली आहे. येथील न्यायालयातून कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरट्यांनी लांबवल्या आहेत. चोरी झालेल्या कागदपत्रांमध्ये एका मंत्र्याशी संबंधित हाय प्रोफाइल प्रकरणातील माहितीचाही समावेश आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
द न्यूज मिनिटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, चोरट्यांनी नेल्लूरमध्ये चौथ्या अतिरिक्त न्यायदंडाधिकारी न्यायालयात घुसून चोरी केली. स्टाफला या घटनेची माहिती गुरुवारी (१४ एप्रिल) रोजी समजली. न्यायालयाच्या बाहेरील एका छोट्या पुलावर पोलिसांना एक बॅग आढळली आहे. त्यामध्ये चोरी झालेल्या काही वस्तू आढळल्या. परंतु न्यायालयातील अनेक दस्ताऐवज गायब आहेत.
आंध्र प्रदेशमधील विरोधी पक्ष तेलुगू देशम पार्टी (टीडीपी) च्या माहितीनुसार, YSRCP चे नेते ककानी गोवर्धन रेड्डी यांच्याविरुद्ध दाखल फसवणुकीच्या प्रकरणातील कागदपत्रांचा चोरी झालेल्या कागदपत्रांमध्ये समावेश आहे. या प्रकरणात टीडीपी नेते सोमीरेड्डी चंद्रमोहन रेड्डी यांनी गुन्हा दाखल केला होता. विशेष म्हणजे याच महिन्यात ककानी गोवर्धन रेड्डी यांना मंत्रिपद मिळाले आहे.
सोमीरड्डी यांची परदेशात कोट्यवधींची मालमत्ता आहे, असा आरोप ककानी रेड्डी यांनी डिसेंबर २०१७ मध्ये केला होता. यातील काही मालमत्तांचे कागदपत्रे त्यांनी माध्यमांनाही दाखवले होते. या प्रकरणामध्ये ककानी यांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप करत सोमीरेड्डी यांनी नेल्लूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
सोमीरेड्डी यांनी ककानी यांच्याविरुद्ध न्यायालयात बदनामी केल्याचा खटला दाखल केला होता. ककानी यांनी सादर केलेले कागदपत्रे बनावट होती आणि त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, असा खुलासा झाला आहे. चोरी झालेल्या प्रकरणाची स्वतः दखल घेऊन चौकशीची मागणी टीडीपी नेते पैयावुला केशव यांनी केली आहे. ककानी यांच्याविरुद्ध दाखल आरोपपत्रात पुरावे म्हणून सादर केलेले कागदपत्रे चोरून कोणाला फायदा होणार आहे, हे सर्वांना ठाऊक आहे, असेही ते म्हणाले.