अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये शनिवार, 11 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कोरोना नियमावलीचे पालन करून अधिकाअधिक पक्षकारांनी सहभागी होवून न्यायालयात दाखल असलेली प्रलंबित प्रकरणे तसेच दाखल पुर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढावीत. असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष श्री. सुधाकर यार्लगड्डा व सचिव रेवती देशपांडे यांनी केले आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या सुचनेनुसार आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दाखलपूर्व व प्रलंबीत प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. सदरचे लोक अदालत आभासी पध्दतीव्दारे देखील आयोजित करणेत आले. त्यानुसार बरीच प्रकरणे आभासी पध्दतीने हाताळण्यात येतील तसेच प्रत्यक्ष उपस्थित होणा-या लोकअदालती देखील ब-याच पक्षकारांना उपस्थित राहण्याबाबत आभासी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे.
अहमदनगर जिल्हा मुख्यालयासह जिल्हयातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयामध्ये घेण्यात येत असलेल्या या लोकअदालतीमध्ये न्यायालयातील दिवाणी, फौजदारी, एन. आय. अॅक्टची प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार कायदया खालील प्रकरणे, कौटुंबीक वादाची प्रकरणे, इलेक्ट्रीसीटी अॅक्ट समजोता प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरचे दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार असून पक्षकारांनी आपसी समजोत्या करिता ठेवुन ती सामंजस्याने सोडवावीत. तसेच ज्या नागरिकांना आपली प्रकरणे सदर लोक अदालतीमध्ये ठेवायची असतील त्यांनी संबंधीत न्यायालयात किंवा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा. असे आवाहन ही आयोजकांनी केले आहे.