इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर येथील न्यायालयाने एका सरकारी कर्मचाऱ्याला ‘तिहेरी तलाक’द्वारे पत्नीला घटस्फोट देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश जीएस दर्जी यांच्या न्यायालयाने याप्रकरणी उपअभियंता सरफराज खान बिहारी (४५) याला एक वर्षाची शिक्षा आणि ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
याविषयी अधिक माहिती देताना सरकारी वकील संजय जोशी म्हणाले की, गुजरातमधील तिहेरी तलाक प्रकरणातील ही पहिलीच शिक्षा असावी. आरोपीची पीडित पत्नी शहनाजबानू हिने सप्टेंबर २०१९मध्ये पालनपूर (पश्चिम) पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. तेव्हा मुस्लिम महिला (विवाहावरील हक्कांचे संरक्षण) कायदा, २०१९ आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आली होती. न्यायालयाने बिहारीला एक वर्षाची शिक्षा सुनावली.
२०१९चा कायद्यानुसार तिहेरी तलाक हा प्रकार बेकायदेशीर आहे. जर तिहेरी तलाकचा वापर केला तर पतीला तीन वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे. बिहारी याने जून २०१२ मध्ये तक्रारदार महिला शहनाजबानूशी लग्न केले होते. त्यांना एक मुलगीही आहे. वकिल गोविंद मकवाना यांनी सांगितले की, बिहारी यांची एका सरकारी पाइपलाइन प्रकल्पात डेप्युटी इंजिनीअर म्हणून बदली झाली होती, जिथे तो एका हिंदू सहकारी तरुणीच्या प्रेमात पडला होता.
प्रेमप्रकरणाची बाब बिहारीच्या कुटुंबियांना कळताच तक्रारदार पत्नीच्या वडिलांनी बिहारीच्या वडिलांची भेट घेतली आणि त्यांनी दोघांना पालनपूर शहरात वेगळ्या भाड्याच्या घरात पाठवण्याचा निर्णय घेतला. याच दिवशी आरोपीने पत्नीला मारहाण केली आणि तिला घटस्फोट देण्यासाठी तीनदा ‘तलाक’ म्हटले होते.