इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बलात्काराच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनाच न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. या तपास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारातून तब्बल २ लाख रुपयांची भरपाई संशयिताला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. देशातील हा बहुदा अशा प्रकारचा पहिलाच निर्णय आहे.
हरियाणाच्या हिस्सार येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सीमा सिंघल यांच्या न्यायालयाने बलात्कार प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या मुकेशची निर्दोष मुक्तता केली आहे. १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली ११ महिन्यांपासून त्याला कोठडीत ठेवण्यात आले होते. तपासात पोलिसांच्या निष्काळजीपणा दिसून आला असून, डीएसपी आणि दोन निरीक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच निर्दोष सुटलेल्या तरुणाला तीन पोलिस अधिकाऱ्यांच्या पगारातून दोन लाख रुपयांची भरपाई द्यावी, असे आदेश उपायुक्त आणि पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या भूपसिंहवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. तर मुकेश हा तरुण निर्दोष असतानाही त्याला या प्रकरणात अडकवण्यात आले. त्यामुळे १७ मार्चपर्यंत आरोपी भूपसिंहविरुद्ध अहवाल तयार करून पाठवा, असे आदेशही न्यायालयाने संबंधित पोलिस खात्याला दिले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १७ मार्च रोजी होणार आहे.
न्यायालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर पोलिस ठाण्यात १९ फेब्रुवारी २०२१ रोजी बलात्कार, जीवे मारण्याची धमकी आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गावातील व्यक्तीने पोलिसांत तक्रार दिली होती की, माझी पत्नी तिच्या १२ वर्षाच्या मुलीला अंघोळ घालत असताना तिच्या कपड्यांमध्ये रक्त दिसले. मुलीला विचारले असता तिने सांगितले की, ११ फेब्रुवारीला दोन तरुण मला धर्मशाळेच्या मागे एका निर्जन ठिकाणी घेऊन गेले होते. तिथे एका तरुणाने माझ्यावर बलात्कार केला. चाकू दाखवत हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारेन, असे सांगितले. भीतीमुळे मुलीने काहीच सांगितले नाही. जेव्हा हे कृत्य कोणी केले याचा शोध घेण्यासाठी मुलीला तिचे पालक घेऊन गेले तेव्हा एका चौकात तो तरुण आढळून आला. त्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून गावातील भूपसिंग याला अटक करण्यात आली.