इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील बीजेडी खासदार अनुभव मोहंती आणि त्यांची पत्नी वर्षा प्रियदर्शिनी यांचा वाद चव्हाट्यावर आला आहे. दोघांमध्ये निकोप शारीरिक संबंध नसल्याने हा वाद समोर आला आणि न्यायालयापर्यंत पोहोचला. नुकतीच या प्रकरणावर निकाल दिला असून, न्यायालयाने वर्षाला दर महिन्याच्या १० तारखेला किंवा त्यापूर्वी ३० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, जेणेकरून ती शहरात इतरत्र राहू शकेल, असे आदेश खासदाराला दिले आहेत. राज्यातील या स्टार जोडप्याच्या घटस्फोटाची प्रक्रिया ओडिशा उच्च न्यायालयात सुरू आहे.
हा आहे वाद
अनुभव मोहंती एक लोकप्रिय अभिनेता होते. त्यानंतर ते राजकारणी बनले. त्यांनी २०१४ साली अभिनेत्री वर्षा प्रियदर्शिनीशी लग्न केले. मात्र, काही काळानंतर दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या. २०१६ मध्ये अनुभव मोहंती यांनी पत्नी वर्षाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. अनुभव मोहंती यांनी आरोप केला होता की, “लग्नाला २ वर्षे झाली आहेत, पण माझी पत्नी शारीरिक संबंध आणि नैसर्गिक वैवाहिक जीवनाला परवानगी देत नाही. वर्षासोबत शारीरिक जवळीक प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही निराशेचा सामना करावा लागतो”, असे त्यांनी म्हणले आहे.
दुसरीकडे वर्षाने तिच्या याचिकेत अनुभववर तिचा आई होण्याचा अधिकार हिरावून घेतल्याचा आरोप केला आहे. अनुभव हा मद्यपी असून त्याचे अनेक अफेअर्स असल्याचा दावाही वर्षा यांनी केला आहे.
कोण आहेत अनुभव मोहंती?
ओडिसी चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेता, अनुभव मोहंती यांनी २०१३ मध्ये बीजेडी सोबत आपली राजकीय खेळी सुरू केली. २०१४मध्ये ओडिशा सरकारने मोहंती यांना राज्यसभेचे खासदार केले. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत अनुभव मोहंती यांनी केंद्रपारा मतदारसंघातून निवडणूक लढवली ज्यामध्ये ते विजयी झाले.
अनुभव मोहंती यांनी जुलै २०२०मध्ये पत्नी वर्षा प्रियदर्शिनी विरुद्ध दिल्ली न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. यानंतर अभिनेत्री वर्षा हिने ७ सप्टेंबर रोजी पती अनुभव मोहंतीविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता.
कोण आहे वर्षा प्रियदर्शिनी?
वर्षा व्यवसायाने अभिनेत्री आहे. ती ओरिया आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम करते. वर्षा तिच्या सामाजिक कार्यासाठीही प्रसिद्ध आहे. वर्षा मुलांचे शिक्षण आणि महिला सक्षमीकरणासाठी काम करते.
न्यायालयाने काय म्हटले?
अनुभवचे वकील आलोक महापात्रा यांनी सांगितले की, वर्षाला दोन महिन्यांत घर रिकामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दोघांनी २०१४ मध्ये लग्न केले आणि आता ते वेगळे होण्यासाठी कोर्टात कायदेशीर लढाई लढत आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वर्षा अनुभवच्या घरी राहत होती. अधिवक्ता महापात्रा यांनी सांगितले की, अनुभवला वर्षाला वेगळ्या घरासाठी दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत पैसे द्यावे लागतील.