चेन्नई – भगवान श्रीकृष्ण यांच्या दोन माता होत्या. जन्म देणारी देवकी आणि त्यांचे संगोपन करणार्या माता होत्या यशोदा. एका आईने जन्म दिला आणि दुसर्या आईने त्यांचे पालनपोषण केले. या दोन मातांमध्ये मुलाविषयी कधीच वाद झाला नाही. परंतु कलियुगात एका मुलीवरून दोन मातांमध्ये वाद निर्माण झाला. त्या वादावर न्यायालयाने न्यायनिवाडा करून एका मातेच्या बाजूने निर्णय दिला आहे.
जन्म दिला नसला तरी जन्मानंतर मुलीचे संगोपन करणार्या आईपासून तिला वेगळे केले जाऊ शकत नाही. परंतु मुलीला जन्म देणारे आई-वडील आणि इतर नातेवाईक आठवड्यातून एकदा तिला भेटू शकतात, असे चेन्नई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
उच्च न्यायालय म्हणाले, ज्या महिलेने मुलीला दत्तक घेऊन गेले दहा वर्ष तिचे संगोपन केले आहे, तिच्याकडे ती राहील. न्यायालयात न्यायमूर्ती पी. एन. प्रकाश आणि न्यायमूर्ती आर. हेमलता यांच्या खंडपीठाने सुनावणी घेऊन या प्रकरणावर हा आदेश दिला.
उच्च न्यायालयाने सलेम येथील बाल कल्याण समितीला मुलीला सत्यांकडे सुपूर्द करण्याचे निर्देश दिले. खंडपीठाने आदेशात आणखी एक गोष्ट स्पष्ट केली. ती म्हणजे, मुलगी वयात येईपर्यंत तिला जन्म देणारी आई सारण्या आणि वडील शिवकुमार तिच्यावर कोणत्याही प्रकारे अधिकार गाजवू शकणार नाही.
जन्म देणारी आई सारण्या यांची ही दुसरी मुलगी आहे. मुलीच्या जन्माच्या शंभर दिवसांतच तिला नणंद सत्या यांना दत्तक दिले होते. त्यानंतर मुलगी दहा वर्षे संगोपन करणार्या सत्या यांच्याकडेच राहिली होती. सत्या यांचे पती रमेश यांचा कर्करोगामुळे २०१९ रोजी मृत्यू झाला होता. त्यामुळे नंतर सारण्या यांनी मुलीचा ताबा पुन्हा मागितला होता.
हे प्रकरण पोलिसांत पोचल्यानंतर मुलीला बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले होते. त्यानंतर दोन्ही पक्षकारांनी न्यायालयात मुलीचा ताबा मिळविण्यासाठी याचिका दाखल केल्या होत्या. उच्च न्यायालयाच्या बाल न्यायालय समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश यांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली. हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच गाजले. न्यायालयाने या प्रकरणाची स्वतः दखल घेऊन सुनावणी घेतली आणि हा आदेश दिला.