निफाड – येथील माजी सरपंच व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष अनिल रंगनाथ कुंदे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा प्रदेश सरचिटणीस सागर सुरेश कुंदे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सचिन अरुण जाधव यांची विनयभंग व सरकारी कामात अडथळा या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली आहे.
त्याचा सविस्तर वृतांत असा आहे की, २४ एप्रिल २०१६ रोजी लासलगाव कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे निवडणुकीचे मतदान निफाड येथील सरस्वती विद्यालयात चालू होते. त्यावेळी तेथे बंदोबस्तासाठी नेमणुकीस असलेल्या एका महिला पोलीस उप निरीक्षकाने अनिल कुंदे, सागर कुंदे व सचिन जाधव यांचे विरुद्ध निफाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. व वरील तिघांनी सरकारी कामात अडथळा केला तसेच विनयभंग केला असा आरोप केला. या तक्रारी वरून वरील तिघा इसमांचे विरुद्ध भा.द.वि.संहिता कलम-३५४ (अ) (१) (४), ३५३, ५०४, ५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला. हा खटला निफाड येथील अतिरिक्त सह जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सह सत्र न्यायाधीश पी. डी. दिग्रस्कर यांचे न्यायालयात चालला. या खटल्यात सरकार पक्षाने सहा साक्षिदार तपासले परंतु, सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपींची न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात आरोपींतर्फे अँड. अण्णासाहेब भोसले यांनी काम पाहिले त्यांना अँड. उत्तम कदम व अँड.समीर भोसले यांनी सहकार्य केले.