नाशिक – लाचप्रकरणात अटक केलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर – वीर यांना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. २५ हजार रूपयांचा बॉण्ड व दर सोमवारी नाशिकच्या एसीबी कार्यालयात हजेरी लावण्याच्या अटीशर्थीवर हा जामीन मंजूर करण्यात आला. जिह्यातील एका शिक्षण संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानाप्रमाणे नियमीत वेतन सुरू करण्याच्या मोबदल्यात आठ लाख रूपयांची लाच स्विकारल्या प्रकरणात शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर – वीर यांना ठाणे एसीबी पथकाने बेड्या ठोकल्या होत्या. सलग चार दिवसांच्या पोलीस कोठडी नंतर गेल्या मंगळवारी त्यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे त्यांचा मुक्काम सेंट्रल जेलमध्ये होता. सोमवारी झालेल्या सुनावणीत मात्र त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
आज झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षातर्फे अॅड. सचिन धोरवडकर यांनी जामीन अर्जास विरोध केला. यावेळी त्यांनी युक्तीवाद करतांना सांगितले की, जामीन अर्जास मंजुरी मिळाली तर तपासावर परिणाम होईल, पुराव्यांची छेडछाड व अधिकारपदाचा गैरवापर करुन साक्षीदारावर दबाव टाकण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. पण, झनकर यांच्यातर्फे युक्तीवाद करतांना अॅड. अविनाश भीडे यांनी हे मुद्दे खोडून काढत जामीन मंजुर करण्याची विनंती केली. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने झनकर यांना जामीन मंजुर करण्यात आला. या सुनावणीसाठी झनकर यांना कोर्टात हजर करण्यात आलेले नसल्यामुळे जामीनवरील सुनावणीनंतर कोर्टाचे रिलीज ऑर्डर सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आली.
अशा झाल्या होत्या फरार
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी वैशाली वीर यांच्यासह दोन जणांवर लाच प्रकरणी कारवाई केली होती. पण, महिला असल्याने सुर्यास्तानंतर अटक करता येत नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने समन्स बजावत वैशाली वीर यांना दिराच्या ताब्यात दिले होते. बुधवारी सकाळी आठ वाजता त्यांना भद्रकाली पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले होते, पण त्या हजर राहिल्या नाही. त्यानंतर न्यायालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्या फरार झाल्याचे न्यायालयात सांगितले. पण, या प्रकरणातील वाहनचालक ज्ञानेश्वर येवले आणि शिक्षक पंकज दशपुते या दोघांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालाने या दोघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर दोन दिवसांनी वीर यांना अटक करण्यात आली.
असे अडकले सापळ्यात
नाशिक शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॅा. वैशाली पंकज वीर- झनकर यांच्यासह तीन जण ८ लखाची लाच घेतांना मंगळवारी सापळ्यात अडकले. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या पथकाला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहकार्य केले. या प्रकरणात तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्याकरिता लाच प्रकरणातील आरोपी पंकज रमेश दशपुते (राजेवाडी येथील प्राथमिक शिक्षक) यांनी आरोपी वैशाली वीर- झनकर यांचे करिता नऊ लाख रुपयाची मागणी केली. त्यांनंतर दिनांक २७ जुलै २०२१ रोजी वीर यांची पडताळणी केली असता त्यांनी सादर कामाकरिता तडजोडी अंती आठ लाख स्वीकारल्याचे मान्य करून लाचेचा पुढील व्यवहार त्यांचे चालक आरोपी क्रमांक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले. सोबत करण्या बाबत सांगितले. त्यांनंतर १० ऑगस्ट रोजी येवले यांनी वीर यांचे करीत तक्रारदार यांचे कडून ८ लाख रूपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले.