नाशिक – खून प्रकरणातील संशयित भाजप नगरसेवक हेमंत शेट्टीसह अन्य सात जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. चार वर्षांपूर्वी पंचवटीमध्ये सराईत गुन्हेगार जालिंदर उगलमुगले उर्फ ज्वाल्या याचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती. यात संशयित भाजप नगरसेवक हेमंत शेट्टी यांच्यासह संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती. या खटल्याची अंतिम सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालात पार पडली. यावेळी पोलिसांना उगलमुगले खून प्रकरणात संशयितांविरुद्ध परिस्थितीजन्य सबळ पुरावे सादर करता आले नाहीत. यामुळे संशयित शेट्टीसह अन्य संशयितांचा या गुन्ह्यात सहभाग न्यायालयात सिद्ध होऊ शकला नाही. त्यामुळे न्यायालयाने सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे.
पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत खून खटल्याची नियमित सुनावणी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षाने यावेळी ४० साक्षीदार तपासले. सरकार पक्षाकडून गुन्ह्याचा कट, खून, पुरावा नष्ट करण्याचा झालेल्या प्रयत्नाबाबतचे पुरावे सादर केले. मात्र, त्यास संशयिताच्या वकिलांनी हरकत घेत परिस्थितीजन्य पुरावे नसल्याचे न्यायालयात सांगितले. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत सबळ पुराव्यांअभावी संशयितांची निर्दोष मुक्तता केली.