नाशिक : नाशिक येथील दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायाधीश यांनी दिवाणी दाव्याचे कामकाज व्हर्च्युअल, व्हिडिओ कॉन्फरन्स माध्यमाद्वारे सुरू केलेले आहे. आता तरुण वकीलांप्रमाणेच जेष्ठ वकीलही यात उत्साहाने सहभाग घेऊन युक्तीवाद करत आहे. आज मंगळवारी एका दाव्यामध्ये प्रतिवादींसाठी जेष्ठ वकील अनिल रामचंद्र देशपांडे यांनी त्यांच्या घरच्या कार्यालयातून एका अर्जावर ऑनलाइन व्हर्च्युअल पद्धतीने दिर्घ युक्तिवाद केला. जिल्ह्यामध्ये वरिष्ठ वकिलांनी व्हर्च्युअल माध्यमाद्वारे युक्तिवाद करण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. वरिष्ठ वकिलांनी ऑनलाइन दिवाणी कामकाजाचा प्रारंभ केल्यामुळे वकील आणि पक्षकारांनी स्वागत केले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वकिलांनी प्रत्यक्ष कोर्टात न जाता त्यांच्या घरातील कार्यालयातून व्हिडीओ माध्यमाद्वारे तोंडी युक्तिवाद आता केला जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, नाशिकचे जिल्हा न्यायाधीश तथा ई कमिटी यांनी व्हर्च्युअल माध्यमाद्वारे नाशिक जिल्ह्यातील कोणत्याही कोर्टात तातडीच्या दाव्यात कामकाज करण्यासाठी ऑनलाइन लिंक उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यानुसार या लिंकव्दारे हे कामकाज झाले.
आता येथून पुढे जे वरिष्ठ वकील आहेत त्यांना त्यांच्या घरच्या कार्यालयातून वेगवेगळ्या दाव्यांमध्ये युक्तिवाद करणे अतिशय सोयीचे होणार आहे. यामुळे जे तातडीचे दावे आहेत, त्यामध्ये पक्षकारांना न्याय मिळण्यास सोपे जाणार आहे. याचप्रकारे कोर्टाचे कामकाजही सुरू होईल अशी अपेक्षा सर्व वकिलांनी व्यक्त केली आहे. या व्हर्चुअल कामकाजास वरिष्ठ वकील अनिल देशपांडे यांना मदत म्हणून त्यांचे सहाय्यक वकील प्रशांत जोशी, प्रितीश कंसारा, विक्रम साळवे यांनी साहाय्य केले. नाशिक जिल्ह्यातील सर्व न्यायालयात ह्या प्रकारचे कामकाज सुरू झाले असल्याने नागरिक आणि वकिलांचा बहुमोल वेळ वाचणार आहे.