नाशिक -इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणी आज अभिनेत्रीसह इतर २० जणांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. बुधवारी या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले पुर्वीचे ५ असे २५ जणांना पुन्हा विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अंमली पदार्थ विरोधी कायदा (एनडीपीएस) गुन्ह्यात या सर्वांना मंगळवारी न्यायालयात हजर केले होते. या सर्वांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
इगतपुरी येथील स्काय ताज व्हिला आणि स्काय लगून व्हिला या दोन खासगी बंगल्यांमध्ये शनिवारी (दि.२६) मध्यरात्रीच्या सुमारास ड्रग्ज, कोकेन, हुक्कासारखे अंमली पदार्थांची नशा करत बॉलिवुडशी संबंधित चार महिलांसह एकुण २२ उच्चभ्रू व्यक्तींचा धिंगाना सुरू असल्याची गोपनीय माहिती नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती. त्यांच्यासह अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर आणि इगतपुरी पोलिसांच्या पथकाने या बंगल्यावर पहाटेच्या सुमारास छापा मारला. यावेळी पोलिसांनी अंमली पदार्थांची नशा करत ‘रेव्ह पार्टी’च्या नावाखाली धिंगाणा घालणार्या सर्वांना ताब्यात घेत पोलिस वाहनातून इगतपुरी पोलीस ठाण्यात आणले होते. याप्रकरणी विनापरवाना अंमली पदार्थ बाळगणे व त्याचे सामुहिकपणे सेवन करणे आणि कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन करत एकत्र येऊन गर्दी जमविल्याप्रकरणी विविध कलमान्वये संबंधितांविरुध्द इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाने अभिनेत्रीसह २० जणांनांच्या पोलीस कोठडीत ५ जुलै पर्यंत वाढ केली होती. त्यांची पोलीस कोठडी सोमवारी संपल्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र इगतपुरी पोलीसांनी त्यांच्यावर दाखल केलेल्या अंमली पदार्थ विरोधी कायदा (एनडीपीएस) गुन्ह्यात न्यायालयाच्या आदेशाने अटक केली आहे. त्यांना पुन्हा आज न्यायालयासमोर हजर केल असता न्यायालयाने विशेष न्यायालयात हजर करण्यास सांगीतले. त्यानुसार यावर विशेष न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्यासह सर्व २५ जणांना उद्या विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे.