नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा व सत्र न्यायालयाने चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या करणा-या पतीस जन्मठेप व २५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सागर गणपत पारधी (२३ रा. मुंजोबा गल्ली, फुलनेगर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना २०२० मध्ये फुलेनगर भागात घडली होती. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक निरीक्षक एम.एस.शिंदे यांनी करून पुराव्यानिशी दोषारोप न्यायालयात सादर केले. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक ६ चे न्या. आर.आर.राठी यांच्या समोर चालला. सरकारतर्फे अॅड.योगेश कापसे व रेश्मा जाधव यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अंमलदारांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस सीआरपीसी कलम २३५ (२) अन्वये भादवी कलम ३०२ मध्ये जन्मठेप व २५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
पत्नीवर चारित्र्याचा संशय
आरोपी सागर पारधी व पत्नी आरती पारधी (१८) हे दांम्पत्य मोलमजूरी करून आपला उदनिर्वाह करीत होते. सागर पारधी हा आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत असल्याने दोघांमध्ये नेहमी खटके उडायचे. १८ जुलै २०२० रोजी दोघांमध्ये किरकोळ वादातून दोघांमध्ये हाणामारी झाली. यावेळी संतप्त सागरने पत्नीचा गळा आवळून व तोंडावर दगडी पाटा टाकून जीवे ठार मारले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20