नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा व सत्र न्यायालयाने तरूणीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकास सात वर्ष सश्रम कारावास आणि पंधरा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. शिवाजी प्रभाकर केदारे (४५, रा. गजानन रो-हाउस, सिन्नर फाटा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना २ जून २०१९ रोजी आसाराम बापू पुल परिसरात घडली होती.
याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याच्या अंतिम सुनावणीत जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. ए. शिंदे यांनी ही शिक्षा सुनावली.या गुह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पवार यांनी करुन दोषारोपपत्र दाखल केले. सरकारतर्फे अॅड आर.एम.बघडाणे यांनी काम पाहिले.
केदारेच्या जाचाला कंटाळल्याने आत्महत्या
पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला होता. मृत तरूणीने २ जून रोजी आसाराम बापू पुलावरून उडी घेत गोदा नदीपात्रात आत्महत्या केली होती. पोलिस तपासात आरोपी शिवाजी केदारे याने मुलीसोबत जवळीक साधून विविध अवस्थेत फोटो काढून त्या फोटोवरून दबाव आणून मारहाण केली होती. त्यानंतर तिच्या भावास धमकी देत मुलीचे ठरलेले लग्नही मोडले होते. त्यामुळे केदारेच्या जाचाला कंटाळल्याने मुलीने आत्महत्या केली असल्याचे तक्रारीत म्हटले होते.