नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पत्नीची किरकोळ भांडणाच्या वादातून लोखंडी फावड्याने डोक्यात मारून निर्घृण हत्या करणा-या पतीला न्यायालयाने दोषी धरून जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे. शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव हिरामण निवृत्ती बेंडकुळे (३०, रा. जय नाणेगाव ता.जि.नाशिक) असे आहे. बुधवार जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक सहाचे न्यायमूर्ती आर. आर. राठी यांनी गुन्हयातील संशयित आरोपीविरूध्द् फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून ही शिक्षा सुनावली.
२५ जानेवारी २०२० रोजी संशयित आरोपीने किरकोळ भांडणाच्या वादातून पत्नी काजल हिरामण बेंडकुळे, २६ हिच्या डोक्यात लोखंडी फावड्याने मारहाण करीत तिची निर्घृण हत्या केली होती. या हत्येबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील सहा.पोलीस निरीक्षक आर. टी. मोरे यांनी करीत संशयित आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून, जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयाल झाली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी अभियोक्ता म्हणून योगेश कापसे यांनी तर, पैरवी अधिकारी म्हणून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील स पो उ नि. जे. व्ही. गुळवे आणि कोर्ट अंमलदार पोहवा.डी.बी. खैरनार यांनी काम बघितले.