नाशिक : घरी सोडण्याचा बहाणा करून बस स्थानकात थांबलेल्या अल्पवयीन मुलीस आपल्या घरी नेवून बलात्कार करणा-या तरूणास जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना २०१७ मध्ये वणी ता. दिंडोरी येथे घडली होती.
सागर दिलीप भोये (२३, रा. इंदिरानगर, वणी, ता.दिंडोरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मांदाणे ता. दिंडोरी येथील अल्पवयीन पीडिता ३ ऑक्टोंबर २०१७ रोजी सायंकाळी आपल्या घरी जाण्यासाठी वणी बसस्थानकात मुक्कामी बसची प्रतिक्षा करीत असतांना ही घटना घडली होती. बसस्थानकात बसलेली असतांना तिला आरोपीने तिला गाठले. आपण तिकडेच चाललो असून तुला तुझ्या गावी सोडतो असे सांगुन तिला दुचाकीवर बसवून नेले. मांदाणे येथे जाण्याऐवजी त्याने मुलीस आपल्या वणी गावातील घरी नेले. तसेच उशीर झाल्याने मुक्कामी राहण्यास भाग पाडले. यानंतर त्याने बळजबरीने बलात्कार केला.
दुस-या दिवशी मुलीने वणी पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केल्याने ही घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक आर.बी.सानप यांनी केला. सरकार तर्फे भक्कम पुरावे तसेच साक्षी पुरावे सादर करण्यात आल्याने आरोपी सागर भोये याच्याविरूध्द दोष सिध्द झाला. न्यायालयाने त्यास १० वर्ष कैद व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ३ महिन्याची साधी कैद असे निकालपत्रात नमुद करण्यात आले आहे.