नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरकारवाडा पोलिस ठाण्यात अधिकारी कर्मचा-यांना शिवीगाळ करणे तलाठी दांम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. या दांम्पत्यास पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. आता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोघांची आता नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. हेमराज निकम व सारीका निकम (रा.श्रीरामनगर,आडगाव शिवार) असे कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या संशयित दांम्पत्याचे नाव आहे. मनुष्य मिसींग प्रकरणात जबाब नोंदविण्यासाठी बोलविलेल्या या दांम्पत्याने जबाब देण्यास नकार देऊन गोंधळ घातला होता.
याप्रकरणी सहाय्यक निरीक्षक विष्णू भोये यांनी तक्रार दाखल केली आहे. मनुष्य मिसींग केसच्या जबाब घेण्यासंदर्भात सरकारवाडा पोलिसांनी संशयित दांम्पत्यास मंगळवारी (दि.२९) पोलिस ठाण्यात बोलावले होते. दुपारी बाराच्या सुमारास सहाय्यक निरीक्षक भोये दांम्पत्याचा जबाब नोंदवित असतांना ही घटना घडली. संतप्त दांम्पत्याने अचानक आम्ही जबाब देणार नाही असे म्हणत जोरात आरडाओरड करीत पोलिस ठाण्यात गोंधळ घातला.
यावेळी अधिकारी आणि कर्मचा-यांनी दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी अर्वाच्च भाषा वापरून शिवीगाळ केली. यावेळी तक्रारदार भोये आणि महिला कर्मचारी पवार आणि आव्हाड यांच्या अंगावर धावून जात संशयित दांम्पत्याने शासकिय कामात अडथळा आणला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली असून, संशयित दांम्पत्यास कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.