नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह आवारात पोलिसांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की करणा-या आरोपीस न्यायालयाने एक महिना साधा कारावास आणि बाराशे रूपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रिन्स चित्रसेन सिंग (३५ रा.कामटवाडा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
ही घटना २०१६ मध्ये याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. १ जुलै २०१६ रोजी कारागृह कर्मचारी आरोपीसह सनी उर्फ ललित विठ्ठलकर.निखील निकुंभ,वतन पवार व किशोर गायकवाड आदी संशयितांना वाहनातून न्यायालयीन कामकाजासाठी घेवून जात असतांना ही घटना घडली होती. कैदी पार्टीचे कर्मचारी संबधितांना वाहनात बसवित असतांना आरोपीने मी सरकारी वाहनात बसणार नाही मला स्पेशल गाडीतून घेवून चला या कारणातून वाद घातला होता. यावेळी संतप्त आरोपीने शिवागीळ करीत पोलिस शिपाई संजय जाधव यांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की केली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुह्याचा तपास तत्कालिन सहाय्यक निरीक्षक एम.एन.वाळेकर यांनी करून पुराव्यानिशी दोषारोप पत्र जिल्हा न्यायालयास सादर केले होते. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालय क्र.६ चे न्या. आर.आर.राठी यांच्या समोर चालला. सरकार तर्फे अॅड.वाय.डी.कापसे यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार,पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदारांनी सादर केलेले परिस्थीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस दोषी ठरवत त्यास सीआरपीसी कलम २३५ (२) अन्वये भादवी कलम ३५३,३३२,३५२,१४३,१४७,४२७ अन्वये प्रत्येकी एक महिना साधा कारावास आणि २०० रूपये अशी एकत्रीत १ हजार २०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली.