नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अल्पवयीन मुलीस पळवून नेत बलात्कार करणा-या सिन्नर येथील आरोपीस न्यायालयाने दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आकाश कन्हैय्या लोणारे (२० रा.शिवाजीनगर,सिन्नर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा खटला विशेष न्यायालयाचे न्या. डी.डी. देशमुख यांच्या कोर्टात चालला. वावीवेस भागात राहणा-या पीडितेच्या आईने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.
आंबेडकरनगर येथील इयत्ता ९ मध्ये शिक्षण घेणारी अल्पवयीन पीडिता ९ नोव्हेंबर २०१८ रोजी सिन्नर येथील लोंढे गल्लीतून आपल्या शाळेत जात असतांना आरोपीने तिला गाठले होते. यावेळी त्याने मुलीच्या भावास जीवे मारण्याची धमकी देत दुचाकीवर बसवून मोहदरी घाटाजवळील हॉटेल सुर्या येथे घेवून जात बळजबरीने बलात्कार केला होता. त्यानंतरच्या महिनाभराच्या कालावधीत पुन्हा धमकी देत त्याने स्व:ता भाडे तत्वावर राहत असलेल्या उद्योगभवन परिसरातील घरी घेवून जात हे कृत्य केले होते. २७ डिसेंबर रोजीही बळजबरीने माळेगाव औद्योगीक वसाहतीतील आम्रपाली हॉटेल येथे घेवून जात त्याने मुलीवर बलात्कार केला. भितीपोटी मुलगी नकार देत नसल्याचे बघून आरोपीने तिच्या असाह्येतेचा फायदा उचलत लोंढे गल्लीतून शाळेत जाणा-या मुलीस गाठले.
ही घटना २१ जानेवारी २०१९ रोजी घडली. मुलीस काही एक न सांगता थेट सिन्नर बसस्टॅण्ड येथे नेले. तेथून बसमधून पळवून नेत गुजरात राज्यात घेवून जात एका शंकराच्या मंदिरात जावून पीडितेच्या गळयात मंगळसूत्र टाकून विवाह केल्याचे भासविले. यानंतर मालेगाव ता.आव्हा जि.डांग येथील बबन यशवंत गायकवाड यांचे घरी घेवून जात दोन दिवस मुक्कामी थांबून तिच्याशी शरिर संबध ठेवले. या काळात पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिस ठाणे गाठल्याने आरोपी पोलिसांच्या हाती लागला होता. याप्रकरणी बलात्कारासह, अपहरण,पोक्सो आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास निफाडचे उपविभागीय अधिकारी माधव पडिले यांनी करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयास सादर केले.
सरकार तर्फे अॅड दिपशिखा भिडे यांनी काम पाहिले. या खटल्यात त्यांनी दहा साक्षीदार तपासले. न्यायालयाने फिर्यादी,पंच साक्षीदार यांनी दिलेली साक्ष आणि सरकारपक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून आरोपीस भादवी कलम ३७६ अन्वये दहा वर्ष सश्रम कारावास आणि दहा हजार रूपये दंड, कलम ३६३ अन्वये दोन वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रूपये दंड, कलम ५०६ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि तीन हजार रूपये दंड तर पोक्सोअन्वये कलम ६ खाली वेगळी शिक्षा दिली आहे.
Nashik Court Legal Rape Minor Girl Molestation Jail Crime