नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा व सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीसह महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास सहा वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. हुजेफ रौफ शेख (२१ रा.माळी गल्ली नं.२,हनुमान मंदिरा शेजारी वडाळागाव) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना वडाळागावातील म्हाडा बिल्डींग भागात २४ मार्च २०२१ रोजी रात्री ही घटना घडली होती. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात विनयभंगासह बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयाचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक एन.एस.बोंडे यांनी करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयास सादर केले होते. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्या.एम. व्ही. भाटीया यांच्या कोर्टात चालला. सरकार तर्फे अॅड.आर.एम.कोतवाल यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अधिका-यांनी सादर केलेले परिस्थीतीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस सीआरपीसी कलम २३५ (२) अन्वये भादवी कलम ३५४,४५२,३२३ आणि बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ चे कलम ८,१२ अन्वये दोषी ठरवत सहा वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
घरात शिरून मुलीचा विनयभंग
अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधत आरोपीने बळजबरीने घरात शिरून मुलीचा विनयभंग केला होता. ही घटना याच इमारतीतील तिस-या मजल्यावर राहणा-या महिलेच्या निदर्शनास आल्याने तिने टोकले असता आरोपीने तिचाही विनयभंग केला होता. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात विनयभंगासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.