नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रेमाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजूरीची आणि दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. महेंद्र उर्फ गोंडया जिभाऊ गरुड (२२, रा. मेशी, ता. देवळा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा खटला विशेष न्यायालयाचे न्या. डी.डी.देशमुख यांच्या कोर्टात चालला. आरोपीने नातेवाईक असलेल्या अल्पवयीन पीडितेस प्रेमाचे आमिष दाखवून शेतातील घर व परिसरात वारंवार बलात्कार केला होता. मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला होता. २३ मे २०१८ रोजी धुळे येथील मेडिकल कॉलेज मध्ये तिचा गर्भपात करण्यात आला. याबाबत देवळा पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालिन सहाय्यक निरीक्षक एम.एल.पवार यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. सरकारी वकील अॅड दिपशिखा भीडे यांनी आठ साक्षीदार तपासून जोरदार युक्तीवाद केला. न्यायालयाने फिर्यादी, पंच व साक्षीदार यांनी दिलेली साक्ष आणि सरकारपक्षाच्या वतीने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून आरोपीस दोषी ठरवत त्यास दहा वर्ष सक्तमजूरी आणि दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.