नाशिक : भागीदारीस तब्बल दीड कोटी रूपयांना गंडा घालणा-या दोघांच्या कोठडीत जिल्हा व सत्र न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची वाढ केली आहे. संशयीत निफाड येथील रेणूका मिल्कचे संचालक असून, त्यांना अटकेनंतर दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
परशराम निवृत्ती पवार (४० रा.रामपूर आंबेवाडी – नैताळे ता.निफाड) व विलास गंगाधर गुंजाळ (४० रा.जळगाव – काथरगाव ता.निफाड) अशी पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. न्यायालयाच्या आदेशान्वये सरकारवाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिल्क ट्रेंडिग व्यावसायीक संदिप दत्तात्रेय आहेर (रा.पाथर्डी फाटा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयीत आणि तक्रारदार यांनी जोडधंद्याच्या संकल्पनेतून रेणूका मिल्क प्लॉन्टची स्थापना केली. यासाठी संशयीत पवार यांच्या पत्नीच्या नावे रामपूर ता.निफाड येथे जमिन खरेदी करण्यात आली. आहेर यांनी गुंतवणुकीची हमी घेत सिडकोतील महानगर बँक आणि राजाराम वराळ व बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून लाखोंची रोकड उभी केली. तर खेळत्या भांडवलासाठी प्लान्टवर दीड कोटींचे कर्ज काढण्यात आले.मात्र हा व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या दोघा संशयीतांनी अल्पावधीतच तोटा झाल्याचे भासवून गैरव्यवहार केला. हा प्रकार लक्षात येताच आहेर यांनी दप्तर तपासणी केली असता संशयीतांनी तब्बल १ कोटी ६५ लाख ५ हजार १८७ रूपयांची गैरव्यवहार करून परस्पर जमिनी खरेदी केल्याचे पुढे आले. यानंतर संशयीतांनी लेखी कबुली जबाब देत वराळ आणि थोरात यांच्या पैश्यांची परत फेड करण्याचे आश्वासन दिले. मात्र पैश्यांची परतफेड न केल्याने आहेर यांनी तगादा लावला असता त्यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला. प्रारंभी पोलीसांनी दाद न दिल्याने आहेर यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतांना तीन दिवसांपूर्वी नैताळे ता. निफाड येथे बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
……..