नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजीवनगर भागात मेव्हणीच्या मुलीसह अन्य एका अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी काकास जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या आरोपीस तीन हजाराचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे. माणिक चोखाजी खिल्लारे (३५ रा.रेणूकामाता चौक) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ३० डिसेंबर २०१९ ही घटना घडली होती. लैंगिक अपराधापासून बालसंरक्षण अधिनियम (पोक्सो) अन्वये ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपीच्या पत्नीच्या बहिणीने तक्रार दाखल केली होती. आरोपी खिल्लारे व तक्रारदार मेव्हणीचे कुटुंबिय एकाच भागात राहतात. त्यामुळे दोघा कुटुंबियात एकमेकांकडे येणे जाणे आहे. ३० डिसेंबर २०१९ आरोपी घरात एकटा असतांना मेव्हणीची १२ वर्षीय मुलगी आणि तिची शेजारी राहणारी १४ वर्षीय मैत्रीण आपल्या काका मावशीच्या घरी गेली असता ही घटना घडली होती. अचानक दोन्ही मुली आल्याने आरोपीने घरात कुणी नसल्याची संधी साधत दोघींशी अश्लिल हवाभाव आणि अंगलट करीत विनयभंग केला होता. ही बाब मुलींनी घरी जावून आपल्या आईकडे कथन केल्याने आरोपीच्या मेव्हणीने पोलिस धाव घेत तक्रार दाखल केली होती. या गुह्याचा तपास उपनिरीक्षक बाकले यांनी करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले होते. विशेष न्यायालयाचे न्या. डी.डी.देशमुख यांच्या कोर्टात हा खटला चालला. विशेष सरकारी वकिल अॅड.दीपशिखा भिडे यांनी सात साक्षीदार तपासले असता न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत त्यास तीन वर्ष सश्रम कारावास आणि तीन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.