नाशिक – चरस बाळगल्याप्रकरणी तिघा आरोपींना न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे. निखिल ऊर्फ सनी सुरेश गायकवाड, इलियाज महमूद शेख, चंद्रशेखर सुखदेव शेरेकर असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. या खटल्याचा निकाल जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश वर्धन देसाई यांनी दिला आहे. पंचवटी पोलिसांनी ६ डिसेंबर २०११ मध्यरात्री रासबिहारी ते मेरी लिंक रोडवर सापळा रचला होता. यावेळी पजेरो गाडीची तपासणी केली असता १३ लाख ८० हजार रुपये किमतीचा ६ किलो ९०० ग्रॅम चरस विक्री करण्याच्या हेतूने शहरात घेऊन चालल्याचे आढळले होते. गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बाजीराव महाजन यांनी पुरावे गोळा केले. संशयितांविरुद्ध न्यायालयात सन २०१३ मध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्यात पोलिस निरीक्षक महाजन, संजय सानप, अमोल रिकामे, संजय साठे, रंजन बेंडाळे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड सुधीर कोतवाल यांनी काम पाहिले.