नाशिक : कर्ज मिळवून देण्याच्या मोबदल्यात बचत गटातील महिलांची लाखो रुपयाची फसवणूक करणा-या तीन महिलांना न्यायालयाने तीन वर्ष सश्रम कारावास आणि साडे चार लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सुरेखा रमेश वाघ, संगिता रामचंद्र पवार (रा.दोघी राजवाडा,सातपूर) व कविता पवार (रा.जयंती हॉस्पिटल समोर, आरटीओ कॉर्नर ) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. न्या. डी. डी. कर्वे यांनी हा निकाल दिला.
नोव्हेंबर २००७ ते सप्टेंबर २००८ दरम्यान हा फसवणूकीचा प्रकार घडला होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालिन निरीक्षक ई.के.पाडळी यांनी गुह्याचा तपास करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र नाशिकरोड येथील न्यायालयात दाखल केले होते. सरकार तर्फे अॅड. सायली गोखले यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अधिका-यांनी सादर केलेल्या परिस्थीतीजन्य पुराव्यास अनुसरुन हा निकाल दिला.
अशी केली फसवणूक
या तिन्ही महिलांनी नाशिकरोड भागातील महिलांशी संपर्क साधून बचतगट स्थापन करण्यास सांगितले. यावेळी दीड टक्के व्याजदराने कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर या महिलांकडून कर्ज मंजूरीसाठी एक, दोन व पाच हजार रूपये असे ८ लाख ४७ हजार ५०० रूपये स्विकारले होते. अनेक महिने उलटूनही कर्ज न मिळाल्याने काही महिलांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.