नाशिक – प्रेयसीचा खून केल्याप्रकरणी प्रियकराला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली आहे. दिलीप सुरेश थाटशिंगार (३० रा.मोठा मातंगवाडा,टॅक्सी स्टॅण्डजवळ,भद्रकाली) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेत गायत्री महेश राव (१७ रा.तपोवन) या मुलीचा खून करण्यात आला होता. आरोपी आणि मृत मुलीमध्ये प्रेमसंबध होते. पण, चारित्र्यांच्या संशयावरून अल्पवयीन असलेल्या प्रेयसीचा खून २ नोव्हेंबर २०१८ रोजी दिलीपने केला होता.या घटनेनंतर गुन्हा दाखल होऊन हा खटला न्या.डी.डी.देशमुख यांच्या कोर्टात चालला. सरकारतर्फे अॅड.दिपशिखा भिडे यांनी बारा साक्षीदार तपासले असता न्यायालयाने फिर्यादी,पंच आणि साक्षीदार यांनी दिलेली साक्ष व पोलीसांचे पुरावे ग्राह्य धरून आरोपीस खूनाच्या गुह्यात जन्मठेप आणि दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
ही घटना जुने नाशिक परिसरातील मोठा मातंगवाडा भागात घडली होती. या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, लग्नाचे आमिष दाखविल्याने गायत्री रावने आपले घर सोडले होते. त्यानंतर ती आरोपी दिलीप थाटशिंगार बरोबर मोठा मातंगवाडा भागात राहत होती. अवघ्या काही महिन्यातच थाटशिंगार हा तिच्यावर चारित्र्याचा संशय घेवू लागला. यातून दोघांमध्ये खटके उडत होते. त्यानंतर २ नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळच्या सुमारास याच कारणातून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी संतप्त दिलीप थाटशिंगार याने डांबून ठेवलेल्या गायत्रीचे हात पाय बांधून लाकडी दांडक्याने व वायरने अमानुष मारहाण केली. या घटनेत तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिचा भाऊ महेश राव याने दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात खून,बलात्कार,अपहरण, बाल लैंगिक अत्याचार पासून संरक्षण अधिनियमसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. भद्रकाली पोलीसांनी आरोपीस अटक करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. त्यानंतर ही शिक्षा सुनावण्यात आली.