नाशिक : मोटारसायकली चोरणा-याला न्यायालयाने चार महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अशोक भिमराव बानाईत (३५ मुळ रा.नाथारा जि.परभणी हल्ली पंचवटी फिरस्ता) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा खटला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी नं.७ चे न्या.प्रतिभा पाटील यांच्या कोर्टात चालला.
भाजीपाला मार्केट यार्डातून पार्क केलेल्या मोटारसायकल चोरीची तक्रार घनशाम भास्कर मोरे (रा.उमराळे ता.दिंडोरी) यांनी तक्रार दाखल केली होती. मोरे १५ डिसेंबर २०२१ रोजी मार्केट यार्डात आले होते. हरीओम कंपनी पाठीमागे लावलेली त्यांची मोटारसायकल चोरीस गेली होती. तत्पूर्वी याच ठिकाणाहून संदिप बिजल भरवाड यांची पॅशन मोटारसायकल १ मार्च रोजी चोरीस गेली होती. दोन्ही घटनांप्रकरणी तक्रार दाखल होताच पंचवटी पोलीस कामाला लागले होते. परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून संशयितास ताब्यात घेतले असता त्याने दोन्ही गुह्यांची कबुली देत मोटारसायकली काढून दिल्या होत्या. या गुह्याचा तपास हवालदार राजेंद्र शेळके व पोलीस नाईक किरण सानप यांनी केला. तपासी अधिका-यांनी सबळ पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस.जे.बागडे व श्रीमती एस.एम.वाघचौरे यांनी सरकार तर्फे कामकाज पाहिले. न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अंमलदाराने सादर केलेले परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस दोन्ही गुह्यांमध्ये सीआरपीसी कलम १४८ (२) अन्वये चार महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली.
…