नाशिक – महाविद्यालयीन विद्यार्थीनीशी असभ्य वर्तन करून तिला मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने एकास सहा महिन्यांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. नरेश भिमराज परमार (२३ रा.पाटीलनगर,सिडको) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदाराने सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस सहा महिने सश्रम कारावास शिक्षेबरोबरच सात हजार रूपये दंडही ठोठावला आहे. हा खटला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्ट नं.४ चे न्या. एम.एम.गादीया यांच्या कोर्टात चालला.
ही घटना १२ एप्रिल २०१२ रोजी बीवायके – एचपीटी महाविद्यालयाच्या आवारात घडली होती. महाविद्यालयीन पीडित तरूणी महाविद्यालयाच्या आवारातील बाथरूममधून प्रवेश द्वाराच्या दिशेने पायी जात असतांना आरोपीने तिच्याशी असभ्य वर्तन करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले होते. यावेळी तरूणीने त्यास विरोध करून जाब विचारला असता आरोपीने तिला हाताच्या चापटीने मारहाण केली होती. याप्रकरणी पीडितेने गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. गंगापूरचे तत्कालीन पोलीस नाईक एम.ए.काझी यांनी या गुह्याचा तपास करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. सरकार तर्फे अॅड. फिरोज शेख यांनी काम पाहिले.