नाशिक – केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी कायद्याविरोधात देशभर रेल्वे रोकोची हाक दिल्यानंतर नाशिकरोड येथे किसान सभा, बहुजन शेतकरी संघटना, पीपल्स रिपब्लिकन पार्टीने एकत्र येऊन रेल्वे रोकोआंदोलन केले होते. या आंदोलनानंतर रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये आयटक राज्य सचिव राजू देसले, माजी नगरसेवक तानाजी जायभावे, माजी उपमहापौर गुलाम शेख, पीआरपीचे गणेश उनव्हणे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज या सर्व आदोलकांना रेल्वे न्यायालयाने प्रत्येकी २१०० रुपये दंड करुन त्यांची गुन्ह्यातून मुक्तता केल्याची माहिती राजू देसले यांनी दिली आहे. यावेळी झालेल्या आंदोलनाचा गुन्हा आम्ही केल्याचे सर्वांनी कबूल केले. त्यानंतर न्यायालयाने हा दंड करुन गुन्ह्यातून मुक्तता केली.या आंदोलनाला उद्या ६ महिने पूर्ण होत असल्याचेही देसले यांनी सांगितले.