नाशिक : कामटवाडा भागात मजूरास मोबाईल चोरीच्या कारणातून बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायलयाने तिघांना तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा खटला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. ए.एस.वाघवसे यांच्या कोर्टात चालला. शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे
उल्हास उर्फ पिंटू वसंत रत्नपारखी (३२),प्रविण उर्फ रवि शंकर आठवले (२५ रा.दोघे मिशनमळा,शरणपूररोड) व कालिदास लुभाजी खंदारे (३८ रा.खोडे मळा,सिडको) अशी आहेत. या घटनेत सदाशिव अर्जुन भगत (५५) यांना बेदम मारहाण करण्यात आल्याने त्यांचा मृत्यु झाला होता.
५ सप्टेंबर २०१८ रोजी कामटवाडा भागात शांताई अपार्टमेंट आवारात मृत आणि आरोपी चेंबर सफाईच्या कामानिमित्त गेले असतांना ही घटना दुपारी घडली होती. काम करत असतांना आरोपी उल्हास रत्नपारखी यांचा मोबाईल चोरीस गेला. मृत सदाशिव भगत यांनीच मोबाईल चोरल्याच्या संशयातून ही हाणामारी झाली होती. संतप्त तिघांनी भगत यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत त्यांच्या पोटावर आणि छातीवर मारहाण झाल्याने अंतर्गत रक्तश्राव होवून भगत यांचा मृत्यु झाला होता. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन उपनिरीक्षक आर.एस.शेवाळे यांनी या गुह्याचा तपास करून न्यायालयात पुराव्यानिशी दोषारोपपत्र सादर केले होते. हा खटला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. ए.एस.वाघवसे यांच्या कोर्टात चालला. सरकार तर्फे अॅड.शिरीष कडवे यांनी काम पाहिले असता न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अमलदाराने सादर केलेल्या परिस्थीतीजन्य पुराव्यास अनुसरून तिघांना तीन वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.