नाशिक – पोलीसावर हात उचलणा-या दुचाकीस्वारास ५०० रूपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. दंड न भरल्यास १५ साधा कारावास असे निकालपत्रात नमुद करण्यात आले आहे. मोटारसायकल पार्क करण्याच्या वादातून मेनरोड येथील महापालिकेच्या पार्किंगमध्ये हा प्रकार घडला होता. सर्फराज शेरखान पठाण (२८ रा. नानावली,भद्रकाली) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाच्या ८ नंबरच्या कोर्टात चालला. सरकारतर्फे अॅड.आर.वाय.सुर्यवंशी यांनी काम पाहिले. न्या.एम.ए.शिंदे यांनी फिर्यादी,साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अधिका-यांनी सादर केलेल्या परिस्थीजन्य पुराव्यास अनुसरून शिक्षा ठोठावली.
काय आहे प्रकरण
भद्रकाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी रफिक अफजलखान पठाण यांनी तक्रार दाखल केली होती. यात दुचाकीस्वाराने हवालदार पठाण यांना शिवीगाळ व दमदाटी करीत थेट गच्ची धरून बटन तोडले होते. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुह्याचा तपास तत्कालिन उपनिरीक्षक जी. बी. बनकर यांनी करून न्यायालयात पुराव्यानिशी दोषारोपपत्र सादर केले.