नाशिक : इलेक्ट्रीक पोल उभारणीसाठी खड्डा खोदल्याच्या कारणातून वीज कंपनीच्या अभियंत्यास मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने एकास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कैलास मधूकर मंडलीक (४२ रा.डीजीपीरोड साईनगर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वीज वितरण कंपनीचे अभियंता हिरालाल रामदास जाधव (रा.अशोकामार्ग) यांनी तक्रार दाखल केली होती. साईनगर भागातील डी.जी.पी.रोड भागात ३ मे २०१२ रोजी सकाळच्या सुमारास इलेक्ट्रीक पोल उभारणीसाठी कंत्राटदाराच्या माध्यमातून खड्डे खोदण्याचे काम सुरू असतांना ही घटना घडली होती. वीज वितरणच्या कोब्रा कंपनीचे ठेकेदार जेयश आईस्क्रीम सेंटर जवळील मोकळया भूखंडा समोर खड्डा खोदत असतांना आरोपीने विरोध केला. त्यामुळे ठेकेदाराने अभियंता जाधव यांना बोलावून घेतले असता ही मारहाण झाली होती. अभियंता जाधव यांनी आपल्या कारने घटनास्थळ गाठले असता आरोपीने माझ्या प्लॉट समोर पोल उभारण्यास का सांगितला या कारणातून कुरापत काढून त्यांना शिवीगाळ व दमदाटी करीत त्यांना काठीने मारहाण केली होती. या घटनेत जाधव यांच्या हाताच्या अंगठ्यास दुखापत झाली होती. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा तपास तत्कालीन हवालदार बी.आर.दाते यांनी करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालय क्र.७ चे न्या. एम.ए.शिंदे यांच्या कोर्टात दाखल केले होते. या खटल्याचे कामकाज सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड.राजेंद्र सुर्यवंशी यांनी पाहिले. न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार आणि पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिका-यांनी सादर केलेले परिस्थीतीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस भादवी कलम ३३२ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
…