नाशिक – पहाटेच्या सुमारास वडिलांच्या डोक्यात पाटा मारून त्यांचा खून करणाऱ्या मुलास न्यायालयाने जन्मठेप व दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव सिद्धार्थ भगवान एडके (३६, रा. गौतमनगर, जेलरोड) असे आहे. २८ मार्च २०१९ रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिद्धार्थ हा संशयी वृत्तीचा असल्याने त्याच्या पत्नीचे व वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याला होता. या संशयावरुन त्याने घरात झोपलेले वडील भगवान नामदेव एडके यांच्या डोक्यात मिर्ची वाटण्याच्या पाट्याने वार करून खून केला होता. घटनेच्या वेळी सिद्धार्थला त्याचा भाऊ व आजीने अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करीत दुखापत केली होती. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात सिद्धार्थविरोधात खून, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेनंतर उपनगर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. सुलभा सांगळे यांनी युक्तीवाद केला. त्यांनी दहा साक्षीदार तपासले तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करीत हा गुन्हा समाजाला काळीमा फासणार असल्याचे सांगितले. सिद्धार्थविरोधात गुन्हा शाबित झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी सिद्धार्थला जन्मठेप व भाऊ आणि आजीला मारहाण केल्याप्रकरणी वर्षभर कारावास व २ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.