पाटणा (बिहार) – मधुबनी जिल्ह्यातील झंझारपूर येथील दिवाणी न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अविनाश कुमार यांच्या न्यायालयीन कामांवर उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. छेडछाडीचा आरोप असलेल्या आरोपीला गावातील महिलांचे कपडे धुण्याच्या तसेच इस्त्री करण्याच्या अटीवर अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी आरोपीला जामीन मंजूर केला होता.
उच्च न्यायालयाच्या सूत्रांनुसार, उच्च न्यायालयाने या आशयाचा आदेश दिला असून, पुढील आदेश मिळेपर्यंत ही बंदी कायम राहील. झंझारपूर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश अविनाश कुमार यांनी विचित्र निर्णय सुनावल्यामुळे ते चर्चेत राहिले आहेत. अविनाश कुमार यांनी कपडे धुणे, नालेसफाई करणे तसेच मुलांना दूध पाजण्यासह अनेक आदेश दिले आहेत.
झंझारपूरच्या दिवाणी न्यायालयात अविनाश कुमार यांनी महिलेशी छेडछाड केल्या प्रकरणात आरोपीला जामीन देताना विचित्र अट ठेवली होती. गावातील सर्व महिलांचे कपडे मोफत धुण्यासह इस्त्री करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. आरोपी ललन कुमार या वर्षी एप्रिलपासून कारागृहात होता. आरोपी कपडे धुण्याचे काम करतो आणि त्याला समाजसेवा करण्याची इच्छा आहे, असे आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते. तक्रारकर्त्याला वाद मिटविण्याची इच्छा असून, त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. आरोपी फक्त वीस वर्षांचा आहे. दोन्ही वादी आणि प्रतिवाद्यांनी प्रकरण मिटविण्याची याचिकाही दिली आहे, असे आरोपीच्या वकिलांनी सांगितले होते.