नाशिक – केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप कार्यालयाची तोडफोड करणारे शिवसेना नगरसेवक, नगरसेवीकेचा पती आणि अन्य तिघा शिवसैनिकांना आज जामीन मंजूर झाला आहे. १५ हजाराच्या जातमुचल्यावर हा जामीन देण्यात आला. शनिवारी या प्रकरणात नगरसेवक दीपक दातीरसह नगरसेविकेचे पती योगेश उर्फ बाळा दराडे, नितीन सामोरे, योगेश चुंबळे, आणि किशोर साळवे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती. आज कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.
या तोडफोड करणा-या नगरसेवकाला अटक करावी म्हणून भाजपने पोलिस आयुक्तांची भेट घेऊन अटकेची मागणी केली होती. खा. संजय राऊत बरोबर हे फरार आरोपी असल्याचाही आरोप केला होता. त्यानंतर नाशिक दौ-यावर असलेले शिवसेनेचे नेते व खा. संजय राऊत यांनी मी देखील खासदार आहे मला कायद्याचा अभ्यास आहे. मी कायदा तोडत नाही. नगरसेवक दीपक दातीर आणि नगरसेविका किरण दराडे यांचे पती बाळा दराडे यांना मी आश्रय दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना मी लगेच पोलिसांसमोर हजर राहायला लावले असेही म्हणाले होते.