नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सात बारा उतारा-यावर वारस नोंद करून देण्याकरिता २० हजार रुपयाची लाच घेणा-या खासगी व्यक्तीस न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रूपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
आगार टाकळी येथील तलाठी यांचे मदतनीस आरोपी खाजगी तोसीफ अहमद बुरानुद्दीन शेख याला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणाबाबत मिळालेली माहिती अशी की, उल्हासनगर येथील मसाला विक्री करणारे आहूजा यांच्या पत्नीचे सातबाराचे उताऱ्यावर मृत्युपत्रावरून वारस नोंद करायची होती. हा दाखला मिळून देण्याकरिता तलाठी यांचे मदतनीस आरोपी खाजगी तोसीफ अहमद बुरानुद्दीन शेख ६ जुन २०२३ रोजी तक्रारदार पंचा समक्ष २० हजार रुपये लाच स्वीकारली व स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला. त्याच्याविरुध्द उपनगर पोलिस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्याची जिल्हा न्यायाधीश बी.व्ही. वाघ यांचे समोर सुनावणी झाली. सदर खटल्याचे कामकाज सरकारी अभियोक्ता अनिल बागले यांनी पाहिले. पोलीसांनी केलेला तपास व महत्वाच्या साक्षीच्या आधारे न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.
या गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक शरद माधवराव पाटील, ला.प्र.वि. नाशिक यांनी केला असून तत्कालीन पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता. सदर खटल्याचे कामकाज कोर्ट अंमलदार पोलिस प्रदीप काळोगे व ज्योती पाटील यांनी पाहिले.