नाशिक – पाथर्डी फाटा येथील मुरलीधर नगर येथील खून खटल्यात जिल्हा सत्र न्यायालयाने तिघांना दोषी ठरवत जन्मठेप व ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ११ मे २०१५ मध्ये ही घटना घडली होती. आनंद संजय खणके (२१) यास फेसबुक वरून झलेल्या भांडणाची कुरापत काढून त्याच्यावर चाकूने वार करून ठार मारण्यात आले होते.
या प्रकरणात इंदिरानगर पोलीस ठाण्यात आरोपी योगेश उर्फ घाऱ्या राजेंद्र जाधव (२०,रा.जय मल्हार निवास,राजपूत कॉलनी,वडनेर दुमाला,ता.जि.नाशिक),सुमित संजय दिंडोरकर (२१,रा.गणेश चौक,नवीन नाशिक),राजरत्न उर्फ राष्ट्रपाल नरवाडे (२३,रा.राजगुरू निवास,आनंद नगर,पाथर्डी फाटा,नाशिक), तुषार उर्फ बंटी अनिल तायडे (२०) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सपोनी आर.डी.गवळी यांनी करत संशयितांना विरोधात आरोप सिध्द होण्याच्या दृष्टीने सबळ पुरावे गोळा केले होते. सदर गुन्ह्याचा खटला जिल्हा सत्र न्यायालय क्रमांक २ येथे सुरु होता. परिस्थितीजन्य पुराव्याला अनुसरून योगेश जाधव, सुमित दिन्डोरकर व राष्ट्रपाल नरवाडे यांना न्यायमूर्ती मृदुला व्ही. भाटीया यांनी जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून दिपक्षीखा भिडे यांनी काम बघितले.