नाशिक – चारित्र्याचा संशय घेवून विवाहीतेचा मानसिक व शारिरीक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांना न्यायालयाने तीन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. समाधान मते (पती),मिराबाई मते (सासू),मोहन मते (सासरे), दत्ता मते (दिर), शिला आरोटे (नणंद रा.सर्व वासननगर,पाथर्डीफाटा) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. स्त्रीधन काढून घेत आरोपींनी रात्री बेरात्री घराबाहेर काढल्याने पीडितेने १९ मार्च २०१२ रोजी पंचवटी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीत म्हटले होते की, विवाहानंतर सासरी राहत असतांना आरोपींनी चारित्र्याचा संशय घेवून घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून पाच लाख रूपये आणण्यासाठी तगादा लावला होता. याच कारणातून अपमानास्पद वागणूक देवून शिवीगाळ व मारहाण करीत होते. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुह्याचा तपास तत्कालीन हवालदार डी.आर.खालकर यांनी केला. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्या.प्रतिभा पाटील यांच्या कोर्टात हा खटला चालला. सरकारतर्फे अॅड.एस.जे.बागडे यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदारांनी सादर केलेले परिस्थीतीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपींनी ३ वर्ष कारावास आणि दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.