नाशिक : शहर बस चालकास बेदम मारहाण केल्याप्रकरणी एकास जिल्हा व सत्र न्यायालयाने सहा महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली. सुजित ओमप्रकाश वर्मा (४२ रा.जेलरोड) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अशोक दत्तात्रेय सांगळे (रा.दत्तनगर,पेठरोड) यांनी तक्रार दाखल केली होती. सांगळे एस.टी.महामंडळात चालक पदावर कार्यरत असून ते २३ डिसेंबर २००६ रोजी शहर बसवर सेवा बजावत असतांना ही घटना घडली होती. राणा प्रताप चौकातील थांब्यावर ते आपल्या ताब्यातील एमएच १२ आर ११७२ या बसमधून प्रवासी उतरवत असतांना अॅटोरिक्षातून आलेल्या आरोपीने आमचा एक माणूस बसमधून पडला तरी तू थांबला नाही अशी कुरापत काढून शिवीगाळ करीत चालक सांगळे यांना बसमधून खाली खेचत बेदम मारहाण केली. यावेळी त्याने बसची काच फोडून नुकसान केले. या हाणामारीत सांगळे यांचे घड्याळ आणि बोटातील अंगठी गहाळ झाली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुह्याचा तपास तत्कालीन हवालदार आर.एन.शेख यांनी करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधिश क्र.८ चे न्या.एम.ए.शिंदे यांच्या कोर्टात चालला. सरकारी वकिल अॅड.राजेंद्र सुर्यवंशी यांनी साक्षी पुरावे तपासले असता न्यायालयाने परिस्थीतीजन्य पुरावे ग्राह्य धरून आरोपी वर्मा यास सहा महिने कारावास आणि एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.