नाशिक : बेटींग व्यवसाय सुरु ठेवण्याच्या मोबदल्यात तीन लाखांची लाच स्विकारणा-या उपनिरीक्षकासह त्याच्या साथीदारास कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे दोघांची रवानगी नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. ग्रामीण पोलिस दलातील उपनिरीक्षक महेश वामनराव शिंदे व संजय आझाद खराडे अशी कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या संशयीत लाचखोरांची नावे आहे. देवळाली कॅम्प परिसरात हा प्रकार घडला होता. ग्रामीणचे उपनिरीक्षक शिंदे आणि खराडे यांनी अवैधरित्या आयपीएल क्रिकेट बेटींग व्यवसाय सुरू असल्याची धमकी देत तक्रारदारास हा व्यवसाय सुरू ठेवण्याच्या मोबदल्यात चार लाख रूपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत लाच लूचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधल्याने दोघांना तीन लाखांची लाच स्विकारतांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. दोघा संशयीतांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.