नवी दिल्ली – अनेक दिवसांपासून काळजी घेणा-या सहाय्यकाला (केअरटेकर) किंवा नोकराला संपत्तीत कधीही कोणताही वाटा मिळू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयद्वारे नोकराचा दावा स्वीकारून सत्र न्यायालय आणि कोलकाता उच्च न्यायालयाचे दिलेले निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलले आहेत.
न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि ए. एस. ओका यांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनावत मालमत्तेवरील ताबा तीन महिन्याच्या आत मालकाकडे सुपूर्द करावा, असा आदेश नोकराला दिला आहे. मालमत्तेचा ताबा मालकाला न दिल्यास नोकराविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. कोणताही नोकर संपत्तीत हक्क सांगू शकत नाही. नोकर किंवा केअरटेकर प्रतिगामी ताब्याचा (एडवर्ड पजेशन) दावाही करू शकत नाही. कारण नोकराला मालकाने देखभालीसाठी ठेवलेले असते. तिथे राहण्याचा तो भाडे किंवा इतर महसूलही देत नव्हता, असे न्यायालयाने म्हटले आहे. मालमत्तेची देखभाल करण्यासाठी निवयुक्त केलेल्या व्यक्तीने मालमत्तेचा ताबा घेतल्यानंतर हे प्रकरण सुरू झाले. या मालमत्तेत अनेक दिवसांपासून राहात असल्याने मालमत्ता माझी झाली आहे, असा दावा नोकराने केला होता. त्यासाठी त्याने दिवाणी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती.