पाटणा (बिहार) – भांडण आणि रागाच्या भरात कोण काय करेल? याचा नेम नसतो. रागाच्या भरात काही घटना घडून जाते. अशीच एक भयानक घटना समोर आली आहे. संतापलेल्या पत्नीने आपल्या पतीला प्रथम विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्याचे गुप्तांगच कापले. विशेष म्हणजे, पत्नीच्या या कृत्याला बळी पडलेल्या पतीने रक्ताच्या थारोळ्यातच पोलिस स्टेशन गाठले. आणि आपली आपबिती कथन केली.
दानापूरच्या फुलवारी शरीफ परिसरात ही भयानक घटना घडली. शरीफ परिसरातील एका वसाहतीत राहणाऱ्या महिलेचे तिच्या पतीसोबत घरगुती वाद झाले. त्याचा राग आल्याने पत्नीने आधी पतीला जेवणात विषारी औषध दिले. ते खाल्ल्यानंतर तो लगेच बेशुद्ध झाला. त्यानंतर पत्नीने पतीचे गुप्तांगच कापले. या घटनेनंतर महिला तिच्या दोन मुलांसह पळून गेली. तर अत्यंत जखमी अवस्थेतच पतीला शुद्ध आली. घडलेला प्रकार पाहून त्याच्या अंगावर काटा आला. अखेर जिवाच्या आकांताने तो तसा घराबाहेर पडला आणि त्याने फुलवारी शरीफ पोलीस स्टेशन गाठले.
पोलिस स्टेशनमध्ये तो पोहचला खरा पण, तो मद्यधुंद असल्यानेपोलीसांनी सर्वप्रथम त्याला मारहाण केली. मात्र, त्याने घडलेली घटना सांगताच पोलिस अवाक झाले. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, जखमी पतीने सांगितले की, त्याच्या पत्नीचे आधीच लग्न झाले आहे. दोघांमध्ये काही मुद्द्यावरून घरगुती वाद झाला. या घटनेनंतर त्याने पत्नीविरुद्ध पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.