नाशिक – तब्बल ८ लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी फरार असलेल्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांच्याबाबत आता राज्याच्या शिक्षण विभागानेही मोठा निर्णय घेतला आहे. लाच घेणे, त्यानंतर त्या फरार होणे यामुळे शिक्षण क्षेत्राची प्रतिमा मलिन होत आहे. याची दखल घेत वैशाली वीर-झनकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्याच्या शिक्षण विभागाच्या अप्पर सचिवांनी शिक्षण आयुक्तांना तसे निर्देश दिले आहेत. अटक टाळण्यासाठी वैशाली वीर-झनकर यांनी नाशिक कोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्याची आजच सुनावणी आहे. त्यावर कोर्ट काय निर्णय देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कोर्टाचा निकाल काहीही लागला तरी शिक्षण विभाग त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करुन तो शिक्षण मंत्रालयाला सादर करणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.