नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतात लाचखोरीची कीड किती फोफावली आहे हे आपण वारंवार पाहत आहोत. यासंदर्भात येणारे वृत्तच खुप काही सांगून जाणारे असते. लाचखोर कोणती युक्ती वापरतील हे सांगणे अवघड आहे. आता एक धक्कादायक आणि अतिशय रंजक स्वरुपाचा लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे. त्याचे वृत्त वाचून तुम्ही सुद्धा थक्कच व्हाल. रेडिओ आपण गाणे ऐकण्यासाठी, बातम्या किंवा नवीन माहिती मिळवण्यासाठी वापरत असतो. पण दिल्लीत चक्क रेडिओचा वापर लाचेची रक्कम ठरवण्यासाठी केल्याचे समोर आले आहे.
दिल्लीच्या अमली पदार्थ विरोधी शाखेचा सहाय्यक आयुक्त ब्रीजपाल, त्याचा पोलिस निरिक्षक गौतम आणि विनोद सप्रा नावाच्या खबऱ्यामधला संवाद चर्चेचा विषय ठरला आहे. रेडिओवरील गाण्याच्या अनुषंगाने हा संवाद असला तरी त्यात २०वरुन १० वर आलेले आणि नंतर १५वर स्थिरावलेले आकडे हे लाचेची रक्कम ठरवणारे असल्याचे समोर आले आहे. ब्रीजपालचे संपूर्ण संभाषण रेकॉर्ड झाले आहे. या संभाषणाचे रेकॉर्डिंग व सहाय्यक पोलिस आयुक्त ब्रीजपाल आणि पोलिस निरिक्षक दुष्यंत यांच्यावर सीबीआयने अटकेची कारवाई केली आहे.
याविषयी सीबीआयमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रीजपाल नावाच्या अधिकाऱ्यासाठी विनोद कुमार सप्रा नावाची व्यक्ती दहा वर्षांपूर्वी खबऱ्याचे काम करायची. त्यावेळी अनेकदा ब्रीजपालला तो वेगवेगळी माहिती देत असत. पण काही काळानंतर सप्राने माहिती देऊनही ब्रीजपालने पैसे देणे बंद केले. पैसे मिळत नसल्याने सप्रानेही माहिती देणे बंद केले. त्याचा राग ब्रीजपालच्या मनात होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी ब्रीजपालचे पोस्टिंग दिल्लीच्या अमली पदार्थ विरोधी पथकात झाले.
ब्रीजपालने पुन्हा एकदा या प्रकरणी तक्रारदाक असलेल्या विनोद सप्राशी संपर्क साधला आणि त्याच्याकडे ५० लाख रुपयांची मागणी केली. तसेच ही रक्कम न दिल्यास त्याच्या पत्नीला अमली पदार्थांसंबंधित केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. तसेच हे पैसे मिळावे यासाठी ब्रीजपालने त्याच्याकडे काम करणाऱ्या दुष्यंत गौतम या पोलिस उपनिरिक्षकाला सप्राकडून वसुली करण्यास सांगितले. यामुळे घाबरलेल्या सप्राने सीबीआयच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत माहिती दिली.
सहाय्यक पोलिस आयुक्त ब्रीजपाल दुष्यंत या पोलिस निरिक्षकाला रेडिओचा आवाज २० पर्यंत वाढवायला सांगतो. यावर सप्रा आवाज फार आहे, कमी करा म्हणत १०पर्यंत आवाज ठीक असल्याचे म्हणतो. ब्रीजपाल, आवाज कमी होणार नाही म्हणतो. त्यानंतर दुष्यंतच्या मध्यस्तीने रेडिओचा आवाज १५वर फिक्स करण्याचे ठरते. हा आवाज म्हणजेच लाचेची रक्कम असते. हे रेकॉर्डिंग करण्यासाठी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सप्राच्या दंडाला शर्टच्या आतमध्ये रेकॉर्डर चिकटवलेला असल्याने हे सगळे बोलणे त्यात रेकॉर्ड होते. रेकॉर्डिंगचा पुरावा मिळताच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये ब्रीजपालवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Corruption Bribe Technique Crime Investigation Trap