नाशिकरोड – शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख व नगरसेविका सौ. सत्यभामा गाडेकर यांचे रविवारी रात्री कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे शिवेसनेला मोठा धक्का बसला आहे.
गाडेकर या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जेष्ठ सदस्या होत्या. त्या तीन वेळा नगरसेविका झाल्या. पहिली निवडणूक त्यांनी १९९२ मध्ये लढवली होती. त्यात त्या विजयी झाल्या. त्यानंतर २००७ मध्ये सुभाष रोड परिसरात त्या पुन्हा नगरसेविका झाल्या. त्यानंतर २०१७ मध्ये प्रभाग क्रमांक २२ मधून त्या पुन्हा नगरसेविका झाल्या. त्यांच्या मागे पती लक्ष्मण गाडेकर, दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे.
लढवय्ये नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले – पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक शहरातील शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचे दुःखद निधन झाले. शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका असलेल्या सत्यभामा गाडेकर यांनी शिवसेना पक्षामध्ये विविध महत्वाची पदे भूषविली. त्या अतिशय लढवय्या नेत्या होत्या. नागरिकांच्या प्रश्नांवर अतिशय आक्रमकपणे भूमिका घेत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या नेहमी तत्पर असायच्या. त्यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेसाठी तत्पर असलेलं एक लढवय्ये नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या निधनाने गाडेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी व माझे कुटुंबीय गाडेकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो अशा शब्दात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी श्रद्दांजली अर्पण केली.