विशेष प्रतिनिधी, नाशिक
येथील भाजपच्या नगरसेविका प्रियंका घाटे यांचे बंधू आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते किशोर घाटे यांचे पुत्र रोशन घाटे यांचा मुंबई नाका येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपाचर घेत असताना मध्यरात्री मृत्यू झाला. त्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर ते उपचारार्थ दाखल होते. मध्यरात्री त्यांची तब्ब्येत अचानक बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. ही बाब समजताच एचसीजी मानवता या खासगी हॉस्पिटलच्या बाहेर मोठा जमाव जमला. यावेळी घाटे कुटुंबिय आणि हॉस्पिटल प्रशासन यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. येथील वातावरणही तापले होते. त्याचवेळी काही संतप्त कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलच्या आवारातील दोन कारला लक्ष्य केले. या कारच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रोशन यांचा मृत्यू झाल्याचा दावा घाटे कुटुंबियांनी केला आहे. तर, योग्य उपचार देण्यात येत होते. मात्र प्रकृती खालावल्याने रोशन यांचा मृत्यू झाल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने म्हटले आहे. घाटे कुटुंबिय व समर्थकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. अखेर मुंबई नाका पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
दरम्यान, याप्रकरणी हॉस्पिटलचे संचालक डॉ. राज नगरकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी किशोर घाटे यांनी केली आहे. तर, पोलिसांनी हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.