नाशिक – महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होवून झालेल्या दुर्घटनेत २४ रुग्णांनी आपला प्राण गमावल्यानंतर या घटनेचा तपास व दोषींवर कारवाई करण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. आता राज्य सरकार पाठोपाठ महानगरपालिकेने या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी स्थायी समितीचे ४ सदस्य व बाहेरील तज्ञ अधिकारी यांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला.
राज्य शासनाची चौकशी समिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली असून यामध्ये आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. प्रमोद गुंजाळ, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य ज्ञानदेव नाठे, महापालिकेचे अधिक्षक अभियंता संदीप नलावडे तसेच ऑक्सिजन पुरवठ्याच्या बाबतीत संपूर्ण राज्यात स्वयंसेवक म्हणून सेवा देणारे हर्षल पाटील यांचा या समितीमध्ये समावेश आहे. तर महानगरपालिकेच्या समितीत सात सदस्य असणार असल्याचे बोलले जात आहे.
कुठलीही तक्रार निर्माण होणार नाही याबाबत दक्षता – गीते
कोरोना विषयक आवश्यक वस्तूंची खरेदी करून कोरोना बाबतच्या कामकाजाला प्राधान्य द्यावे व त्याबाबत कुठलीही तक्रार निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना स्थायी समितीच्या बैठकीत दिल्या असल्याची माहिती स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी दिली.
नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून हा प्रादुर्भाव कमी होण्याच्या दृष्टीने महापालिका वेगवेगळ्या स्तरावर विविध प्रकारे काम करीत आहे हे काम करत असताना रेमडेसीवर या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असून हे इंजेक्शन त्वरित १० हजार खरेदी करण्यात यावे. तसेच आज मितीस सध्या दररोज ५०० नग इंजेक्शन घेत आहे त्यात वाढ करून १ हजार इंजेक्शन हे मनपा नगरसेवक,पदाधिकारी,कर्मचारी,अधिकारी व स्वयंसेवी संस्थांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्ररित्या दररोज उपलब्ध होतील असे त्याचे नियोजन करून व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आल्या. मनपाच्या वतीने ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेशन किट तातडीने खरेदी करण्याबाबत यावेळी वैद्यकीय विभागास सूचना देण्यात आल्या.डॉक्टर, नर्सेस,फ्रंट लाईन वर्कर, सफाई कर्मचारी,कोरोना मध्ये काम करणारे कर्मचारी व मनपाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा विमा काढण्याच्या सूचना यावेळी संबंधित विभागास देऊन तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मनपाच्या बिटको रुग्णालयातील सिटीस्कॅन व सोनोग्राफी मशीन हे तातडीने सुरु करण्याबाबत या बैठकीत सूचना देण्यात आल्या.डॉ. झाकिर हुसेन रूग्णालयात ऑक्सीजन गळतीची घटना घडली त्याच्या चौकशीसाठी मनपा स्थायी समितीचे ४ सदस्य व बाहेरील तज्ञ अधिकारी यांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच ऑक्सिजनबाबतचे ऑडिट करण्यासाठी मनपा अधिकारी व स्थायी समिती सदस्यांची समिती गठित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. खाजगी हॉस्पिटलकडून रुग्णांना आकारणी येणाऱ्या बिलांच्या तपासणी साठी प्रत्येक रुग्णालय निहाय ऑडिटरची मनपाच्या वतीने नेमणूक केली आहे. मात्र तरी देखील अद्याप तक्रारी येत असल्याने त्याच्या चौकशीसाठी मनपाच्या स्थायी समिती सदस्यांची समिती गठित करण्यात येणार आहे. डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन गळतीच्या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना पाच लक्ष रुपये देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून मानधनावरती नियुक्त कर्मचाऱ्यांना वेळेत पगार देण्याचे नियोजन करण्याचे सूचना संमधीत विभागास स्थायी समितीच्या बैठकीत दिल्या असल्याची माहिती स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी दिली.