वॉशिंग्टन – कोरोना विषाणूची उत्पत्ती कुठे झाली, याबाबत तर्कवितर्क मांडणे सुरू असताना हा विषाणू चीममधील प्रयोगशाळेतूनच लीक झाल्याचे अमेरिकेकडे पुरेसे पुरावे उपलब्ध झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी कोरोना विषाणूची उत्पत्ती कुठे झाली याचा शोध घेण्याचे आदेश अनेक गोपनीय माहितीच्या आधारे दिले आहेत. विविध गोपनीय माहिती आणि कॉम्प्युटर विश्लेषणाच्या सहाय्याने या गुढतेची उकल होण्याची शक्यता अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कोरोना विषाणू चीनच्या प्रयोगशाळेतून लीक होणे, चीनच्या लोकांमध्ये याबाबत झालेली चर्चा, प्रयोगशाळेतील व्यवहार आणि वुहान शहराजवळ विषाणूच्या स्फोटाच्या पॅटर्नबाबतचे पुरेसा डाटा उपलब्ध झाला असून, त्याच आधारावर हा दावा करण्यात आला आहे.
बायडेन संशोधकांकडून समर्थन
जो बायडेन यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे अनेक संशोधकांनी स्वागत केले आहे. कोरोनाची उत्पत्ती चीनमधून झाल्याची गोष्ट नाकारली जाऊ शकत नाही, असे १८ संशोधकांनी सायन्स पत्रिकेला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेसह आतापर्यंत जी चौकशी झाली ती विश्वासार्ह नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
ब्रिटन संशोधकांचाही दावा
कोरोना विषाणूची निर्मिती चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेतूनच झाल्याचा दावा ब्रिटेनच्या संशोधकांनी केला आहे. कोरोनाचे कोणतेही नैसर्गिक गुणधर्म नाहीत. त्यामुळे हा पूर्णतः मानवनिर्मित असल्याचा दावा संशोधक प्रा. अँगल डल्गलिश आणि नॉर्वेचे शास्त्रज्ञ डॉ. बिर्गर यांनी केला आहे. कोरोनाचा घातकपणा वाढविण्यासाठी त्यांनी वटवाघुळाचा वापर केला. कोरोनाची लस निर्मितीसाठी अभ्यास करत असताना ही बाब स्पष्ट झाल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. याबातचे वृत्त डेली मेलने दिले आहे.
वुहानमध्ये हालचाली
चीनच्या वुहान शहरामधील प्रयोगशाळेत नागरिक शोधकार्यासह लष्कराच्या हालचाली झाल्या होत्या, असे अमेरिकेचे माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री माइक पॉम्पियो यांनी फॉक्स न्यूजला माहिती दिली. प्रयोगशाळेत फक्त संशोधनाचे काम होते, हा चीनचा दावा चुकीचा आहे. तिथे पीपल्स लिबरेशन आर्मीशी संबंधित काम सुरू होते, असे त्यांनी म्हटले आहे.