पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपाययोजना म्हणून वेगवेगळ्या देशांमध्ये आरोग्य तज्ज्ञ, वैद्यकीय अभ्यासक आणि संशोधक अथक प्रयत्न करीत असून विविध प्रकारची औषधे तथा इंजेक्शन यावर संशोधन सुरू आहे, मात्र अद्यापही कोरोनावर प्रभावी आणि रामबाण ठरेल, अशा औषधाचा शोध लागलेला नाही, असे दिसून येते. परंतु दरम्यानच्या काळात भारतात योग गुरु रामदेव बाबा यांनी आपण कोरोनावर प्रभावी असे औषध शोधून काढल्याचा दावा केला होता. परंतु या दाव्यात किती तथ्य आहे, याची उलटसुलट चर्चा सुरू होती. त्या काळात एका व्यक्तीने महाराष्ट्रातील एका व्यक्तीने न्यायालयात याचिका दाखल करून योग गुरु रामदेव बाबा यांचा दावा हा दावा खोटा असल्याचे म्हटले होते.
योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीबाबत महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील न्यायालयाने पोलिसांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. कारण याबाबतच्या तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की योगगुरूंनी पतंजलीचे उत्पादन ‘कोरोनिल’ कोरोना विषाणूवर उपचार करू शकते, असा खोटा दावा केला होता.
जुन्नर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग न्यायालयासमोर वकील मदन कुर्हे यांनी जुलै २०२० मध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर न्यायदंडाधिकारी (प्रथमवर्ग) पी.व्ही.सपकाळ यांनी आपल्या आदेशात जुन्नर पोलीस ठाण्याला आता दि. ७ फेब्रुवारी २०२२ पर्यंत याप्रकरणी अहवाल देण्यास सांगितले आहे. तसेच न्यायाधीशांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, कथित आरोपी या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेरील ठिकाणी राहत असल्याचे रेकॉर्डवरून दिसून येते. त्यामुळे या घटनेला पुढे जाण्यासाठी पुरेसा वाव आहे का, याचा आधी तपास करावा लागेल.
अशा परिस्थितीत, कथित आरोपींवरील कारवाईला स्थगिती देणे आवश्यक आहे मात्र गुन्ह्याचे स्वरूप पाहता, संबंधित पोलिस ठाण्याला निर्देश देणे आवश्यक आहे. दरम्यान, कुर्हे यांनी त्यांच्या तक्रारीत दावा केला होता की, पतंजलीचे संस्थापक रामदेव आणि व्यवस्थापकीय संचालक बाळकृष्ण यांनी त्यांच्या ‘कोरोनिल’ आणि ‘श्वसरी’ या उत्पादनांद्वारे कोविड-19 वर १०० टक्के उपचार विकसित केल्याचे प्रसारमाध्यमांना जाहीर केले होते.
तक्रारीत म्हटले आहे की, आयुष मंत्रालयाने नकारात्मक प्रतिसाद दिला होता आणि पतंजलीला योग्य पडताळणी होईपर्यंत औषधांची जाहिरात किंवा विक्री करण्यापासून परावृत्त करण्यास सांगितले होते. वैधानिक अधिकाऱ्यांकडून योग्य पडताळणी आणि मंजुरीपूर्वी, कोविड-19 वरील औषध आणि प्रसिध्दी पत्रकाचे प्रकाशन तथा उपचारांच्या शोधाबद्दल एकतर्फी दावे केले गेले होते, ते दावे कायद्यानुसार ‘खोट्या दाव्या ‘च्या कक्षेत येतात.
कुर्हे यांनी आरोप केला की, दोन्ही आरोपींनी एकत्रितपणे गुन्हेगारी हेतूने पतंजली औषध सादर केले आणि त्याचा प्रचार केला आणि यापूर्वीच कोणत्याही पडताळणीशिवाय औषधाची जाहिरात करून अनेक कायद्यांचे उल्लंघन केले आहे. शिवाय कोविड-19 महामारीमुळे जग दहशतीच्या काळातून जात असताना केवळ व्यवसाय करण्याच्या उद्देशाने नागरिकांमध्ये खोट्या आशा निर्माण करण्यासाठी आरोपी आणि त्यांच्या कंपनीकडून बेजबाबदारपणे ही कृत्ये करण्यात आली.